Wednesday, May 29, 2019

ऋतू

बरसती थेंब नभातुन, दाहक ग्रीष्मा नेति
रिती केली वरुणाने, जणू शुभ्र रत्नांची पोती

स्पर्शता थेंब धरणीला, सर्वत्र गंध मातीचा
नवनिर्मितीची ती चाहुल, आनंदोत्सव चैतन्याचा

वृक्षा लाभे नवरंग, पक्षांची लगबग भारी
हिरवा शालू धरणीला, ऋतूराजाच आला दारी


- स्वरूप खाडिलकर

ती . . .

नयनांचा मादक बाण घेऊन
ती आली साताजन्माची आण घेऊन

सामंजस्याचा स्वर घेऊन
ती आली अन्नपूर्णेचा वर घेऊन

जन्मभराची साथ घेऊन
ती आली मधूमय रात घेऊन

हवासा लाडिक राग घेऊन
ती आली स्वार्थाचा त्याग घेऊन

सोनेरी भविष्याची आशा घेऊन
ती आली आयुष्याची दिशा घेऊन

- स्वरूप खाडिलकर 

20-06-2017

राग

मुक्या शब्दांची या, रीत ही निराळी
सांगती मला ते, अशक्य जे कुणाही

लटीक्याच रागाचा, असे हा अबोला
नजरेत पाहिलेला, स्पर्शात जाणलेला

उगाच टाळसी तू, माझ्या समोर येणे
कधीच जाणिले मी, चोरून ते पहाणे

निववून टाक राग, नेत्रात दाटलेला
कर मुक्त तू जिव्हाळा, हृदयात साठलेला

- स्वरूप खाडिलकर

कृपा


पुर्णान्नाचे ताट समोर
अज्ञ त्यासी शोधी दूरवर
मनुष्यजन्मी येऊन देखील
तैसेची झाले आमुचे आजवर

धुंद होतो जीवनी आजवर
कृपा केली तरीही मजवर
हरिभक्तीची महती समजाया
सन्मुख केले सर्व चराचर

पुण्याला मिळता उपासनेची जोड
योग जुळवितो तो विश्वंभर
अकल्पित देई तो करुणाकर
सर्वाची मग होते सुकर

जया कृपेचा भाग्यवंत हा पामर
तया चरणी नमावितो शीर
ध्यानी मनी विसावा तोची निरंतर
मागणे हेची जोडोनी दोन्ही कर.

स्वरूप खाडिलकर.

प्रवास

नभा सोसवेना भार
लागे पावसाची धार
थेंबाथेंबात अधीर
भेटावया धरणीला

आकाशात धडधड
मग विजेचा कल्लोळ
होई टापूरटिपूर
थेंबाथेंबच्या स्पर्शाने

थेंब मिळे जो मातीला
मृदगंध प्रसाविला
धुंदधुंद तो जाहला
सारा आसमंत आज

मग पश्चिमेचा ध्यास
थेंबाथेंबाचा प्रवास
लागे नभाचीच आस
बिंदू मिळे तो सिंधुला

06-09-2018

Monday, November 25, 2013

स्वरूपोवाच

तोडूनिया निघा आळसाचे  दार ।
यश नाही दूर फार मग ।।

निश्चय मनात करा दृढतर ।
 होईल सत्वर ध्येयपूर्ती ।।

असावा विचार विवेकाचा मनी ।
होईल मग जनी कीर्ती तुझी ।।

नम्रता असावी  आपल्या मनात ।
कमी न मायेत तुम्हा भासे ।।

 कर्म करा सदा सचोटीने ।
काही नुरे उणे स्वरूप म्हणे ।।

Sunday, July 21, 2013

दिशाहीन

देश माझा खूप मोठा
जगामध्ये थोर स्थान |
तरीसुद्धा जगतोय
होऊनि तो दिशाहीन  |1|

चालतोय चालू द्यावा
प्रतिकार तो टाळावा |
सावळया या गोंधळत
खिसा आपला भरावा |2|

तरुण पिढीच्या हाती
शिक्षणाची आहे कास |
उद्या काय करायचे
याच्या उत्तरची आस |3|

समान उद्दिष्ट नाही
स्वातंत्र्याचा स्वैराचार |
सुवर्णमय इतिहासी
भविष्यातला अंधार |4|

नको पैसा देशासाठी
नको आम्हाला प्रसिद्धी |
ध्येय द्या हो ध्येय द्या हो
तेव्हा होईल समृद्धी |5|

- स्वरूप खाडिलकर 
21 जुलै 2013.