Monday, November 25, 2013

स्वरूपोवाच

तोडूनिया निघा आळसाचे  दार ।
यश नाही दूर फार मग ।।

निश्चय मनात करा दृढतर ।
 होईल सत्वर ध्येयपूर्ती ।।

असावा विचार विवेकाचा मनी ।
होईल मग जनी कीर्ती तुझी ।।

नम्रता असावी  आपल्या मनात ।
कमी न मायेत तुम्हा भासे ।।

 कर्म करा सदा सचोटीने ।
काही नुरे उणे स्वरूप म्हणे ।।

Sunday, July 21, 2013

दिशाहीन

देश माझा खूप मोठा
जगामध्ये थोर स्थान |
तरीसुद्धा जगतोय
होऊनि तो दिशाहीन  |1|

चालतोय चालू द्यावा
प्रतिकार तो टाळावा |
सावळया या गोंधळत
खिसा आपला भरावा |2|

तरुण पिढीच्या हाती
शिक्षणाची आहे कास |
उद्या काय करायचे
याच्या उत्तरची आस |3|

समान उद्दिष्ट नाही
स्वातंत्र्याचा स्वैराचार |
सुवर्णमय इतिहासी
भविष्यातला अंधार |4|

नको पैसा देशासाठी
नको आम्हाला प्रसिद्धी |
ध्येय द्या हो ध्येय द्या हो
तेव्हा होईल समृद्धी |5|

- स्वरूप खाडिलकर 
21 जुलै 2013.

Wednesday, June 26, 2013

प्रेमानंतरची कहाणी..

तो प्रेम करतो आणि ती प्रेम करते
सगळ्यांची गोष्ट नेमकी इथेच संपते
नंतरची कथा कधी कुठेच नसते 
तरी पण.. तो प्रेम करतो आणि ती प्रेम करते


गोड शेवट हा असतो नव्याचा उगम
प्रेमाच भावगीत तिथे राहत नाही सुगम
समजून घेण्याच चाक मग उलटेच फिरते
तो प्रेम करतो आणि ती प्रेम करते


मजनूचा होतो मेल्या आणि प्रेयेची होते बाई
तेव्हा मात्र वाटत आपली झाली थोडी घाई
सुफल संपूर्ण कहाणीची इच्छा पूर्णपणे विरते
तो प्रेम करतो आणि ती प्रेम करते


'एकटा जीव सदाशीव' हे होते ब्रीद वाक्य
पुस्तक पेपर स्वयंपाकघराशी होते जास्त सख्य
'नकार दिलेल्यांची' किंमत तेव्हा जास्तच वाटते
तो प्रेम करतो आणि ती प्रेम करते..

-स्वरूप खाडिलकर