Monday, October 22, 2012

नोकरी


"तुम्ही नेहमी इथेच असता?" जॉर्जच्या त्या प्रश्नाने साधूने डोळे उघडले "मला माफ करा पण तुमच्या कडे बघून मला राहावल नाही, म्हणून विचारलं" जॉर्ज म्हणाला.
स्मित हास्याने त्या साधूने जॉर्ज कडे बघितलं. "हो मी नेहमी इथेच असतो." साधू उत्तरला.
"तुमच्या अन्न-पाण्याचे काय? तुम्ही इथे आयुष्य कसे काढणार? नेमक काय करणार आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात? माझे हे प्रश्न तुम्हाला त्रासदायक वाटत असतील पण मला मनापासून वाटतंय म्हणून मी विचारलं." जॉर्ज साधूला म्हणाला.
"मी तुमची काळजी समजू शकतो. पण मला अजून तरी त्यापैकी कसलीच चिंता वाटत नाही." साधू त्याच शांत स्वरात उत्तरला.
"पण मग तुम्ही दिवस रात्र करता काय? म्हणजे तुमच्याकडे पाहून तुम्ही चांगले शिकलेले वाटता. प्रयत्न केल्यास तुम्हाला नोकरी नक्की मिळेल, हव तर मी तुम्हाला चांगली नोकरी मिळवून देण्यात मदत करीन." जॉर्ज साधूला म्हणाला.
"तुमची मदत करण्याची इच्छा पाहून मी भरून पावलो.पण मला अजून तरी नोकरीची गरज वाटत नाही." साधू उत्तरला.

साधूच्या उत्तराने जॉर्जच्या प्रश्नार्थक मुद्रेत भरच पडली. 
त्याच्या त्या भावना ओळखून साधू म्हणाला "तुम्हाला असलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तर देईन. त्याआधी माझ्या काही प्रश्नांची तुम्ही उत्तर द्याल का?"
"नक्की देईन" जॉर्ज म्हणाला.
"तुम्ही कुठे नोकरी करता?" साधूने विचारलं.
"मी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकेत उच्च पदावर काम करतो." जॉर्ज म्हणाला.
"या नोकरी मागचा तुमचा उद्देश काय आहे" साधूने विचारलं.
"अर्थार्जन हाच मूळ उद्देश. माझ चार माणसाचं कुटुंब आहे. त्यांची जबाबदारी सर्वार्थाने माझ्यावरच आहे. त्यासाठी मला नोकरी करावीच लागते." जॉर्ज म्हणाला.
"म्हणजे तुम्ही कुटुंबसाठी नोकरी करता" साधू म्हणाला.
"हो पण त्याचबरोबर या नोकरीत मी देखील खूप खुश आहे. मला खर्या अर्थाने त्यातून समाधान मिळते." जॉर्जने त्याच्या उत्तरात भर घातली.
"अच्छा म्हणजे या नोकरीतून तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची गरज भागवता." साधू म्हणाला.
"गरज?? मला कळल नाही तुम्हाला काय म्हणायचं ते." जॉर्ज गोंधळलेल्या स्वरात म्हणाला.
"तुम्ही कुटुंब चालवता म्हणजे त्यासाठी पैशाची गरज असणार. तुमच्या मुलांचे हट्ट पुरवण, घरखर्च, थोडी मौजमजा यासाठी पैसे तर लागणारच. तसच तुम्ही म्हणालात तुम्हाला देखील या नोकरीतून समाधान मिळते. म्हणजे तिथे तुमची बौद्धिक गरजसुद्धा पूर्ण होते." साधूने त्याचे म्हणणे विस्तृत स्वरुपात मांडले.
"हो. तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर आहे. नोकरी करण्यामागची माझी भावना तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलीत." जॉर्ज साधूला म्हणाला.
"मग आता मला सांगा की हे मुलांचे हट्ट पुरविणे, मौजमजा करणे, आवडीची नोकरी करणे हे सर्व कशासाठी" साधूने जॉर्जला विचारले.
"कशासाठी म्हणजे या सर्व गोष्टी माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत. त्यांच्यासाठीच तर मी हे आयुष्य जगतोय" जॉर्ज म्हणाला.
"म्हणजे या गोष्टीतून तुम्हाला आयुष्य जगण्याचा उद्देश मिळतो, आनंद मिळतो." साधू म्हणाला.
"अर्थात" जॉर्ज म्हणाला.
"म्हणजे ही नोकरी तुम्हाला आयुष्याच्या अर्थापर्यंत नेते, हवा असलेला आनंद देते." साधूने त्याचे म्हणणे अजून स्पष्ट केले.
जॉर्जने होकारार्थी मान हलवली.
"मग आता माझ्या या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मुलांचे संगोपन, मौजमजा, स्वतःची बौद्धिकगरज पूर्ण करणे यामधून तुम्हाला आनंद मिळतो. आणि हे सर्व काही एकत्र साधण्यासाठी तुम्ही हि नोकरी करता असा तुम्ही म्हणालात. थोडक्यात हा आनंद तुमच्या आयुष्याच ध्येय आहे. मग हा जो आनंद आहे तो नेमका येतो कुठून?" साधूने विचारले.
"कुठून म्हणजे आत्ताच तुम्ही उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टीतून." जॉर्जने चटकन उत्तर दिले.
"नाही तस नाही. या सर्व गोष्टी आनंदाची अनुभूती देणारी साधन आहेत. त्या आनंदाची नेमकी निर्मिती कोण करत."
"देव. आनंदाचा तोच एक सर्वश्रेष्ठ निर्माता." जॉर्जने मनापासून उत्तर दिले.

आपल्या अढळ अशा स्मितहास्याने साधू उत्तरला, "..आणि मी त्याचीच नोकरी करतो....."

-स्वरूप खाडिलकर.

Friday, May 18, 2012

सुहृद

आयुष्य शोधिता जाई
न मिळे परंतु किनारा
कधी अलभ्य लाभ तो होई
जणू सागर तळी वारा

असतात मनी जे प्रश्न
असते उत्तर त्यापाशी
तो नकळत आणून देई
चिंतिले जे मी मनाशी

मौनात घडे संवाद
चिंतनाने घडते कृती
संचिताचे असते ते फल
जशी पुण्याची फलश्रुती

तो मिळतो क्वचित कुणाला
नक्षत्रातील जसा मोती
लखलाभ त्याचा व्हावा
तरी सर्वांना या जगती

तो नसे सखा वा सोबती
आई बाप किंवा पत्नी पती
रक्ताची नसली जरी
असती सर्व तिथे नाती

ना तेथे वचनाचा बंध
कर्तव्य नसे प्रेमाचे
मनमुक्त तरी परिपूर्ण
सुहृद नाव या नात्याचे

-स्वरूप खाडिलकर
खिडकीत लाउनी डोळे, त्या कातर सायंकाळी
वाटत होते यावे कुणी तरी मज जवळी.
माहित नव्हते नाव, तिचे मज त्या क्षणाला
ती भावनाच पुरेशी, होती माझ्या मनाला... 

Friday, March 23, 2012

गोडाचे गोडवे..


पाडवा संक्रांत होळी राखी, दसरा असो वा दिवाळी
गोडगोड खाण्यासाठी, कारणे ही निरनिराळी

ताटभर पुरणपोळी, आवडते फार
बाधू नये म्हणून, त्यावर तुपाची धार

नारळी पौर्णिमेला, होतो नारळी भात
राखी बांधताना मात्र, काजू कतलीची साथ

गणपती बाप्पा आले, कि आनंदाला नाही पार
त्या दिवसात खातो, उकडीचे मोदक वारंवार

साखरेच्या पाकात, बेसन घाला वा रवा
दिवाळीच्या फराळात, लाडू तर हवा

तूप साखरेचा कहर, म्हणजे गोडगोड चिरोटे
खाताना हरपते भान, चाटत बसाल बोटे

खमंग गुळपोळी आणि तिळगुळ छोटे छान
New Year cake नंतर, गोड म्हणून यालाच मान

उन्हाळ्यात येता फळांचा राजा, होतो आमरस
कशातही घालून खाता, होई पदार्थ तो सरस

गोडाच्या या साखळीत, न पडावा कधी खंड
त्याच करिता योजिले आहे, आम्रखंड-श्रीखंड

याहून सुद्धा निमित्ताशिवाय, जर जर खावस वाटतंय गोड
साजूक तुपातल्या शिरयाला, आहे का कशाची जोड..

-स्वरूप खाडिलकर.

आशा


आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

होईन उद्या मी मोठा, दिसेन सुंदर छान
विद्याविभूषित स्वावलंबी, मिळेल मजला मान
आशेस्तव बालपणी या, विद्यार्जन आपुले होई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

अनुरूप आणि सुशील, मिळेल साथीदार
जोडीने त्याच्या सुखाचे, आयुष्य जाईल फार
त्या लाजर्या आशेने, मन पुलकित आपुले होई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

गोंडस गोड पिलाची, चाहूल येई मनात
विसरेन मी सर्व दुःख, पाहता त्याला क्षणात
या बोबड्या आशेने, नवचैतन्य जीवनी येई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

पाल्यास पालक करण्यात, जाईल काळ सुखाने
सरता शेवटी जगेन, मी पूर्ण निश्चिंत मनाने
परिपक्व अशा आशेने, उरली वाट सुखाची होई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

होईल नवी पहाट, माझा असेल दिवस तो
या आशेपोटी मनुज, निद्राधीन रोजची होतो
पांगळ्या मनास आपुल्या, आशाच उभारी देई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही ..

-स्वरूप खाडिलकर.

प्रेमात..


हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

सुरु होतो दिवस माझा तिला message करून
खटपट करतो सगळी साध पाहाय तिला दुरून
बोलण्यात तिच्या मी इशारा शोधत असतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

पहाता तिला येते हास्य माझ्या ओठावरी
स्पर्श तिचा होता विरघळे दुनिया माझी सारी
तिच्या कुशीतल्या Teddyत मला मीच दिसतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

लग्ना-बिग्नाच्या गोष्टीत हल्ली घेतो जास्त रस
'मी नाही त्यातला'च्या अभिनयात लागतो मग कस
पण खर तर प्रत्येक जोडीत मला 'आम्हीच' दिसतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

स्वर्गसुखागत भासते मला तिचे हसू
मरणयातना होई दिसता तिच्या डोळी आसू
तिला दुखावलं की मी माझ्यावरच रुसतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

रोज मनात अनेकदा propose तिला करतो
समोर तिच्या गेल्यावर उगाच घाबरतो
'उद्या नक्की विचारीन' हा निश्चय मात्र असतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..


-Swaroop Khadilkar

Sunday, January 29, 2012

माणसाच्या तर्हा

थंडीत शिरला अंगात आळस कंटाळा येत राही
नुसता बसून गेला दिवस केल काही नाही

थंडीत शिरली अंगात उर्जा केली धावपळ
पाच किलोमीटर धावणे वाटे डाव्या हाताचा मळ

थंडीत शिरता मनी प्रेम आठवण तिची होई
गोड गुलाबी थंडी मग अजून मधाळ होई

थंडीत येते औदासिन्य जेव्हा कातरवेळी 
घालमेल मनाची वाटे हवे कोणी जवळी

थंडीत जाता डोक्यात राग चिडचिड होई फार
बाहेर असले थंड जरी पित्त करी बेजार

ऋतु असो कोणताही माणसाच्या तर्हा दहा
पटत नसेल तर थंडीला replace करून पहा 


स्वरूप खाडिलकर
30-1-2011
8.45 AM

Tuesday, January 24, 2012

उठ मुला...

उठ मुला उठ मुला
बघ माध्यान्योदय झाला

पाणी आता जाईल 
अंघोळ पुन्हा राहील
शरीरास्तव घे कष्ट जरा
उठ मुला उठ मुला..

न्याहारी समय उलटून गेला
तरी डोळा ना उघडीला
भोजनकाळ आता झाला
उठ मुला उठ मुला..

वडील तुझे किलबिलती
ण फार आम्हा करती
त्यांच्यास्तव तू बैस जरा
उठ मुला उठ मुला..

मित्र तुझे येउनी गेले
भ्रमणध्वनी ते खणखणले
ये तुझ्या या जगताला 
(आता तरी) उठ मुला उठ मुला....

Sunday, January 15, 2012

संधी





ती येते दबक्या पावली हळूवार ठोठवी दार
द्या उत्तर तिजला सत्वर थांबत नाही ती फार

कधी येते ती अपूल्या अपेक्षित दारी
कधी इतक्या अवचित की उडविते झोप सारी

वाटते पाहावी वाट कधी संयामाने
कधी हजर पुढयात ती फक्त चिंतनाने

नखरेल फार ती मागते त्वरितच वेळ
हुकली जरका मग लपंडावाचा खेळ

मोहावायास तिजला करा प्रयत्न वारंवार 
प्रसन्न होता करेल तुमचा जयजयकार

ठेवा विश्वास संधी मिळेल पुन्हा नव्याने
करा प्रयत्नाचा परिस स्पर्श होईल मग तिचे सोने ..




-स्वरूप खाडिलकर