Friday, March 23, 2012

गोडाचे गोडवे..


पाडवा संक्रांत होळी राखी, दसरा असो वा दिवाळी
गोडगोड खाण्यासाठी, कारणे ही निरनिराळी

ताटभर पुरणपोळी, आवडते फार
बाधू नये म्हणून, त्यावर तुपाची धार

नारळी पौर्णिमेला, होतो नारळी भात
राखी बांधताना मात्र, काजू कतलीची साथ

गणपती बाप्पा आले, कि आनंदाला नाही पार
त्या दिवसात खातो, उकडीचे मोदक वारंवार

साखरेच्या पाकात, बेसन घाला वा रवा
दिवाळीच्या फराळात, लाडू तर हवा

तूप साखरेचा कहर, म्हणजे गोडगोड चिरोटे
खाताना हरपते भान, चाटत बसाल बोटे

खमंग गुळपोळी आणि तिळगुळ छोटे छान
New Year cake नंतर, गोड म्हणून यालाच मान

उन्हाळ्यात येता फळांचा राजा, होतो आमरस
कशातही घालून खाता, होई पदार्थ तो सरस

गोडाच्या या साखळीत, न पडावा कधी खंड
त्याच करिता योजिले आहे, आम्रखंड-श्रीखंड

याहून सुद्धा निमित्ताशिवाय, जर जर खावस वाटतंय गोड
साजूक तुपातल्या शिरयाला, आहे का कशाची जोड..

-स्वरूप खाडिलकर.

आशा


आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

होईन उद्या मी मोठा, दिसेन सुंदर छान
विद्याविभूषित स्वावलंबी, मिळेल मजला मान
आशेस्तव बालपणी या, विद्यार्जन आपुले होई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

अनुरूप आणि सुशील, मिळेल साथीदार
जोडीने त्याच्या सुखाचे, आयुष्य जाईल फार
त्या लाजर्या आशेने, मन पुलकित आपुले होई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

गोंडस गोड पिलाची, चाहूल येई मनात
विसरेन मी सर्व दुःख, पाहता त्याला क्षणात
या बोबड्या आशेने, नवचैतन्य जीवनी येई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

पाल्यास पालक करण्यात, जाईल काळ सुखाने
सरता शेवटी जगेन, मी पूर्ण निश्चिंत मनाने
परिपक्व अशा आशेने, उरली वाट सुखाची होई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही

होईल नवी पहाट, माझा असेल दिवस तो
या आशेपोटी मनुज, निद्राधीन रोजची होतो
पांगळ्या मनास आपुल्या, आशाच उभारी देई
आशेच्या चाकावरती जगद्रथ धावत राही ..

-स्वरूप खाडिलकर.

प्रेमात..


हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

सुरु होतो दिवस माझा तिला message करून
खटपट करतो सगळी साध पाहाय तिला दुरून
बोलण्यात तिच्या मी इशारा शोधत असतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

पहाता तिला येते हास्य माझ्या ओठावरी
स्पर्श तिचा होता विरघळे दुनिया माझी सारी
तिच्या कुशीतल्या Teddyत मला मीच दिसतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

लग्ना-बिग्नाच्या गोष्टीत हल्ली घेतो जास्त रस
'मी नाही त्यातला'च्या अभिनयात लागतो मग कस
पण खर तर प्रत्येक जोडीत मला 'आम्हीच' दिसतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

स्वर्गसुखागत भासते मला तिचे हसू
मरणयातना होई दिसता तिच्या डोळी आसू
तिला दुखावलं की मी माझ्यावरच रुसतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..

रोज मनात अनेकदा propose तिला करतो
समोर तिच्या गेल्यावर उगाच घाबरतो
'उद्या नक्की विचारीन' हा निश्चय मात्र असतो
हल्ली ना मी जरा प्रेमातच असतो..


-Swaroop Khadilkar