आयुष्य शोधिता जाई
न मिळे परंतु किनारा
कधी अलभ्य लाभ तो होई
जणू सागर तळी वारा
असतात मनी जे प्रश्न
असते उत्तर त्यापाशी
तो नकळत आणून देई
चिंतिले जे मी मनाशी
मौनात घडे संवाद
चिंतनाने घडते कृती
संचिताचे असते ते फल
जशी पुण्याची फलश्रुती
तो मिळतो क्वचित कुणाला
नक्षत्रातील जसा मोती
लखलाभ त्याचा व्हावा
तरी सर्वांना या जगती
तो नसे सखा वा सोबती
आई बाप किंवा पत्नी पती
रक्ताची नसली जरी
असती सर्व तिथे नाती
ना तेथे वचनाचा बंध
कर्तव्य नसे प्रेमाचे
मनमुक्त तरी परिपूर्ण
सुहृद नाव या नात्याचे
-स्वरूप खाडिलकर
No comments:
Post a Comment